वनविभागाकडुन लाकुड मालासह ट्रकजप्त; 3 जणांवर वनगुन्हा दाखल
सांगोला(प्रतिनिधी):- विनापरवाना वृक्षतोड करुन विनापरवाना वाहतूक करणार्या ट्रक लाकुड मालासह जप्त करुन 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दिली. ट्रक चालक , लाकुड व्यापारी व शेतकरी यांच्यावर वनगुन्हा दाखल करून लाकुड मालासह ट्रक जप्त केला आहे.
वनपरिक्षेत्र सांगोला मधील वाकी (घेरडी) ता. सांगोला येथे वनअधिकारी सांगोला फिरती करत असताना मालकी क्षेत्रात कडुलिंब जळावू लाकुड 16 घ.मी विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले. यावेळी ट्रक चालक यांचेकडे वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना विचारले असता वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना घेतला नाही असे सांगितले त्यामुळे ट्रक लाकुड मालासह जप्त करण्यात आला. कडुलिंब जळावू लाकुड 16 घमी असून बाजार भावाप्रमाणे अंदाजे रु.35000/- किंमत आहे.
सदरची कारवाई मा.मुख्य. वनसंरक्षक (प्रा) पुणे. एन.आर. प्रवीण, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री.बी.जी.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर, वनपाल श्री. एस. एल. वाघमोडे, वनरक्षक श्री.एस.एस. मुंढे, वनमजूर श्री.आर.एस. करताडे यांनी केली.