चोरट्यांनी पळविल्या 2 म्हशी
सांगोला(प्रतिनिधी):- अज्ञात चोरट्यांनी चार चाकी वाहनातून 85 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी चोरुन नेल्या असल्याची घटना सांगोला येथे घडली. चोरीची फिर्याद श्रीमती राजाबाई नरोटे (रा. नरोटेवस्ती गावडे पेट्रोलपंपामागे सांगोला ता. सांगोला) यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 08 जुलै रोजी रात्री 8 वाजणेचे सुमारास जेवणखाण केलेनंतर फिर्यादी यांची पंढरपुरी म्हैस बाहेर साखळीला बांधुन ठेवली होती. फिर्यादी व मुलगा अतुल घरात झोपले होते. रात्री 12.30 वा. चे सुमारास उठुन पाहीलेनंतर म्हैस दावणीला होती. दि.09 जुलै रोजी पहाटे 3 वाजता उठुन घराचे बाहेर येवुन पाहता म्हैस साखळी सहीत नसल्याचे दिसले, त्यामुळे म्हशीचा आजपर्यंत शोध घेतला पंरतु म्हैस कोठेही मिळून आली नाही. त्यामुळे म्हैस चोरीस गेल्याची खात्री झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.
तसेच फिर्यादी यांचे घरापासुन साधारण 1 किमी अंतरावर राहणारे सौ. लक्ष्मी व्हटे यांची पण म्हैस दि. 09 जुलै 2024 रोजी पहाटे 2 वा. चे सुमारास चोरीस गेली असल्याचे समजले आहे. म्हैस कोणत्यातरी चार चाकी वाहनातुन अज्ञात चोरट्याने नेली असल्याचे फिर्यादी नमूद करण्यात आले आहे. याबाबत अज्ञात चोरट्याविरुध्द सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.