अभिनव पब्लिक स्कूलमध्ये रंगला बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा

अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे अभिनवच्या बाल वारक-यांचा नयनरम्य बालदिंडी व रिंगण सोहळा संपन्न झाला. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक, रिंगण आणि विठू माऊलीच्या नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनव पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.
शाळेतील सर्व मुला मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान देव, आणि संत मुक्ताई यांच्या वेशभूषा साकारलेले विद्यार्थी या दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरले. मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम व उपस्थित पालक वर्गाच्या हस्ते विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा व पालखीचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले रिंगण सोहळा, मुलांच्या हातात टाळ, भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन पाहून खरंच पंढरपूर वारीला निघालेला भास होत होता. यावेळी स्कूल मधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभंग सादर करत विठू नामाचा गजर केला.विठ्ठल रुक्मिणी यांच्यासोबत महिला पालक तसेच इतर वारकरी बालचंमुनी फुगडी खेळत या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. या नयनरम्य सोहळ्याची सांगता उत्साहात व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षके तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले