जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथे दिंडीचे उत्साहात आयोजन

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे जतन करणाऱ्या आषाढी-बालादिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिंडीत विद्यार्थी व पालकांनीही अभंग सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी टाळाच्या साथीने अभंग गायले. घसर फुगडी ,होडी ,काटवट खणा दुगड व तिघड फुगडी याबरोबरच लाठी काठी हे सांस्कृतिक आणि मर्दानी खेळ मुली आणि मुलांनी सादर केले. गणेश नगर शाळेचे मुख्याध्यापक राजाराम बनसोडे यांचे उत्कृष्ट नियोजन होते. इयत्ता चौथीची विद्यार्थिनी प्रज्ञा जवंजाळ हिने हस्तकला आणि कार्यानुभवाच्या उपक्रमांचा वापर करून सुंदर सजवलेली पालखी तयार केली.
शिक्षिका रुपाली पवार मॅडम यांनी टाळ, ढोलकी, तुळस आदी चित्रे व अभंगाच्या ओळी लिहून आषाढी बाल दिंडी सोहळ्याचा फलक सजवला. तसेच आषाढी विशेष विठ्ठल मूर्तीची रांगोळी काढून वातावरण मंगलमय केले होते. अंगणवाडी सेविका मेखले मॅडम व सर्व विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.कचरनाथ बाबा मंदिराजवळ विद्यार्थ्यांनी रिंगण धरले .जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली होती. तसेच विद्यार्थ्यांनी गायलेल्या अभंगाने यादव यांच्या मळ्यातील दत्त मंदिर परिसर मंत्रमुग्ध झाला. यादव तसेच विटेकर परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
पालक दत्तात्रय बाबर यांनी सर्व दिंडीला पेढे वाटले .विजय बाबर यांनी दिंडीसाठी खाऊवाटप केले .शाळेकडून विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू वाटप करण्यात आले .सर्व पालक ,नागरिक यांचे शाळेकडून आभार मानण्यात आले .यशस्वीपणे कार्यक्रम पार पडल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून दिंडी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पंढरपूरच्या आषाढी वारी अगोदरच चोपडी परिसरात विविध शाळांमध्ये अशा प्रकारच्या दिंड्या काढून विठ्ठल भक्तीचे वातावरण निर्माण केले जात आहे विद्यार्थ्यांच्या मनात विठ्ठल भक्ती रुजवली जात आहे हा सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम शाळांच्या माध्यमातून होतंय याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.