लाडकी बहिण योजना कधीपर्यंत सुरु राहणार? अजित पवार यांचं महत्त्वाच वक्तव्य
विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. मुख्यमंत्री कोण याचा विचार आम्ही केला नाही, या राज्याला मुख्यमंत्री दिला जाईल. याची आपण काळजी करू नका. मला फक्त विकास आणि गरिबी कमी करण्याविषयी विचारा” असं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाच वक्तव्य केलय. त्या शिवाय पिंक जॅकेटवरुन अमोल कोल्हे यांना सुद्धा उत्तर दिलय. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यावर सुद्धा अजित पवार बोलले आहेत. अमोल कोल्हे यांनी काल अजित पवार यांच्या पिंक जॅकेट घालण्यावर टिप्पणी केली होती. “दादा गुलाबी जॅकेट घालतात. यामागे राज्याचं वातावरण गुलाबी करण्याचा त्यांचा मानस असू शकतो. पण तसं काय होईल असं वाटत नाही, जॅकेट घालून राजकारण होत नाही” असं अमोल कोल्हे म्हणाले. त्यावर आज अजित पवार यांनी उत्तर दिलं. “मी माझ्या पैशाने पिंक जॅकेट घातलं. मी काय घालायचं हा माझा प्रश्न आहे. अमोल कोल्हे काय बोलला यावर उत्तर द्यायला मी बांधील नाही. मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी ब्रँडींग, प्रमोशन असलं काही करत नाही” असं अजित पवार म्हणाले.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यावर अजित पवार म्हणाले की, “भेट घेतली म्हणून काय झालं? आज अनेक आमदार माझी भेट घेतात. तुम्ही बेनकेना विचारा की ते का भेटले? भेट घेतली म्हणून बिघडलं का?” पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावर अजित पवार म्हणाले की, “निवडणुका जवळ आल्या की लोक इकडे तिकडे जातात. त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा असते. जागा आपल्याला सुटणार की नाही याबद्दल शंका असते. तेव्हा अशा घटना घडत असतात. याविषयात माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. आताशी तर सुरुवात आहे. पुढे अशा गोष्टी जास्त प्रमाणात होतील. आमच्याकडेही काही लोक येवू पाहताहेत”
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भातही अजित पवार यांनी महत्त्वाच भाष्य केलं. “काही राज्यातील योजना महिलांना उपयुक्त ठरतात. त्या आम्ही स्वीकारल्या. त्या त्या वेळची परिस्थिती बघून निर्णय घेतो. गरिबांसाठी योजना आणतो. समाजाच्या हितासाठी योजना आणल्या आहेत. आता आम्ही योजना आणल्या, त्याला विरोधक कसे चांगले म्हणणार? जनतेसाठी या योजना आणल्या. त्या पुढे चालू ठेवायचा असतील, तर जनतेने आम्हाला सपोर्ट करावा तरच त्या योजना पुढच्या काळात सुरू राहतील” असं अजित पवार म्हणाले.