सांगोला तालुकाराजकीय
वंदे मातरम् चौक परिसरातील अतिक्रमण न काढल्यामुळे दि. १ मे रोजी उपोषणास बसणार-माजी नगरसेवक आनंदा माने

सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला शहरातील वंदे मातरम् चौक ते चिंचोली रोड आरक्षण क्र. ४७ बगीचापर्यंतचे अतिक्रमण त्वरीत काढावे, अन्यथा दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनापासून सांगोला नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती माजी नगरसेवक आनंदा माने यांनी दिली.
शहरातील वंदे मातरम् चौक ते चिंचोली रोड आरक्षण क्र. ४७ बगीचापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला विविध हातगाडे व शेडनेट मारून नागरिकांनी अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेले आहे. या अतिक्रमणामुळे तेथील वाहतूकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तसेच रेल्वेगेट पडल्यानंतरही मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी निर्माण होत असून लवकरात लवकर सदरचे अतिक्रमण काढून घ्यावे, यासाठी सांगोला नगरपरिषद प्रशासन यांच्याशी लेखी पत्रव्यवहारही केला होता.
परंतू, मुख्याधिकारी मात्र सदरचे अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत असून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली कामे करत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर मुख्याधिकारी ठेकेदारांच्या कामांची बिले जेवढ्या तत्परतेने काढताना दिसतात, तशीच तत्परता नागरिकांची कामे करताना का दिसत नाही? असा सवालही यावेळी आनंदा माने यांनी उपस्थित केला.